बलात्कार पीडितेच्या वडिलांची गर्भपातासाठी बॉम्बे हायकोर्टात याचिका

१६ वर्षांच्या बलात्कार पिडितेच्या वडीलांनी मुलीचा गर्भपात करण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केलीये. मुलीची तब्येत चांगली नसल्याने गर्भपातास परवानगी द्यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आलीये. कोर्टाने याबाबत केईएमच्या डॉक्टरांना १३ ऑक्टोबरच्या आत याबाबत रिपोर्ट देण्याचे आदेश दिलेत

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या अॅनिमियाग्रस्त मुलीच्या गर्भपातासाठी एका पित्याने बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केलीये. मुलीची तब्येत चांगली नाही, प्रसूती आणि बाळाला माझी मुलगी सांभाळू शकणार नाही, त्यामुळे गर्भपाताची परवानगी द्यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आलीये.

बॉम्बे हायकोर्टाने मुलीच्या वडिलांच्या याचिकेवर केईएम रुग्णालयातील डॉक्टरांना आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना केईएम रुग्णालयाचे अधीष्ठाता डॉ. अविनाश सूपे म्हणतात, “आम्ही हायकोर्टाला आमचा अहवाल सुपूर्द केलाय. ही मुलगी जवळपास २७ आठवड्यांची गर्भवती आहे.”

भारतात २० आठवड्यांवरील गर्भाच्या गर्भपातास परवानगी नाही. कायद्याने हा गुन्हा मानला जातो.

२६व्या आठवड्यात गर्भपात करताना काही अडचणी येऊ शकतात. याबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विनिता राऊत म्हणतात, “जर योग्य पद्धतीने गर्भपात झाला तर काहीच होणार नाही. पण, यासाठी खास सोयी-सुविधा असणाऱ्या रुग्णालयातच गर्भपात केला गेला पाहिजे. २० आठवड्यांवरील गर्भपाताची परवानगी नाही. पण, माझ्य़ा मताप्रमाणे ही सीमा २४ आठवड्यांपर्यंत वाढवली पाहिजे.”

गेल्या महिन्यातच सुप्रीम कोर्टाने १३ वर्षांच्या बलात्कार पीडितेचा गर्भपात करण्याची परवानगी दिली होती. पण, गर्भ ३१ आठवड्यांचा असल्याने डॉक्टरांनी गर्भपात न करता या मुलीची प्रसूती केली. पण, दोन दिवसांनंतरच या मुलीचं बाळ दगावलं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter