धक्कादायक: १३ वर्षांच्या मुलीच्या पोटातून काढला १६ किलोचा गाठ

गेल्या दोन वर्षांपासून उत्तरप्रदेशातील ही १३ वर्षांची मुलगी वाढलेल्या पोटासह जगत होती. मुंबईतील कामा रुग्णालयात डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून या मुलीच्या पोटातून १६ किलोचा गोळा काढलाय. उत्तरप्रदेशातील डॉक्टरांना योग्य निदान न झाल्यानं या मुलचा त्रास वाढत गेला.

0
244
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

उत्तरप्रदेशातील लहानशा गावात राहणाऱ्या सवेरा अहमदला (१३), मुंबईतील डॉक्टरांनी जीवनदान दिलंय. कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी सवेराच्या अंडाशयातील तब्बल १६ किलोचा गोळा काढून तिचे प्राण वाचवलेत.

पाचवीत शिकत असलेल्या सवेराला दोन वर्षांपूर्वी पोटात वेदना सुरू झाल्यानंतर स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र, अवघ्या काही महिन्यानंतर पोटाचा घेर वाढू लागला. अनेक डॉक्टरांकडून उपचार झाले, एक्स-रे चाचण्या केल्या मात्र आजाराचं निदान झालं नाही.

उत्तरप्रदेशातील एका डॉक्टरने कर्करोग असल्याची शक्यताही वर्तवली. मुलीला कर्करोग असल्याचं कळल्यावर तिच्या आजीला धक्काच बसला होता. आर्थिक परिस्थिती बेताची त्यात उपचाराचा खर्च कसा उचलायचा अशी भिती त्यांना होती.

वडिलांनी सवेराला मुंबईत आणून टाटा रुग्णालयात उपचार करण्याचं ठरवलं. मात्र त्याआधी कामा रुग्णालयात एमआरआय, सीटीस्कॅन केल्यानंतर सवेराच्या अंडाशयाला चिकटून मासांचा गोळा असल्याचं निदान झालं. सवेरावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी तब्बल १६ किलो वजनाचा गोळी तिच्या पोटातून काढला.

यासंदर्भात बोलताना कामा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक व स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. राजेश्री कटके यांनी सांगितलं की, “आमच्याकडे ही मुलगी आली तेव्हा तिच्या पोटाचा घेर प्रचंड होता. सीटीस्कॅन चाचणीत तिच्या ओव्हरीमध्ये ट्यूमर असल्याचं निदान झालं. या मुलीच्या उजव्या बाजूच्या अंडाशयाला चिकटून हा गोळा होता. अंडाशयापासून फुफ्फुसापर्यंत हा ट्यूमर होता. हृदयालाही चिकटलेला होता. त्यामुळे या मुलीला चालायला बसायला व श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. परंतु, आम्ही यशस्वी शस्त्रक्रिया करून या मुलीचं प्राण वाचवले.”

उपचारादरम्यान या मुलीचं वजन ४५ किलो होतं तर आता शस्त्रक्रियेनंतर ३१ किलो झालंय. महिनाभर तिच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू होते. लवकरच तिला डिस्चार्ज दिला जाणार आहे.

सवेराचे वडिल रहिस अहमद म्हणाले की, “२०१७मध्ये दिवाळीत घरी गेल्यावर मुलीला पाहिलं. तिच्या पोटाचा आकार मोठा जाणवला. डॉक्टरही याबाबत काहीच बोलत नव्हते. एका डॉक्टरनं तर कर्करोग असल्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर अधिक काही होऊ नये, म्हणून तिला मी मुंबईत आणलं. कामा रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मुलीचा जीव वाचला.”

शीव रुग्णालयातील स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. राहुल मयेकर म्हणतात की, “पोटामध्ये लहान गाठ येऊन त्याच रुपांतर मोठ्या गोळ्यात होतं. याप्रकारची अनेक प्रकरणं मी पाहिली आहे. पण इतक्या लहान वयात १६ किलोचा गोळा घेऊन दोन वर्ष राहणं खूपच अवघड आहे. या मुलीच्या अंडाशयात गाठ असल्यानं तिला ओव्हरी ट्यूमर असं म्हटलं जातं. हा नॉन कॅन्सर ट्यूमर असतो. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करून गोळा काढणंही अवघड असतं. कारण प्रत्येक अवयवांना तो चिकटलेला असतो.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter