धक्कादायक! भारतात १४.६ कोटी महिला ‘अॅनिमिया’ने ग्रस्त

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिलीये. जगभरात जवळपास ६१ कोटी महिला अॅनिमियाने ग्रस्त आहेत. ज्यातील सर्वात जास्त म्हणजे १५ ते ४९ या वयोगटातील १४.६ कोटी महिला फक्त एकट्या भारतात आहेत. शरीरात ‘लोहा’च्या कमतरतेमुळे ५० टक्के महिलांना अॅनिमिया असल्याचं सर्व्हेक्षणात पुढे आलंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

भारत आणि अॅनिमिया,

  • जागतिक आरोग्य संघटनेनुसार २०११ मध्ये ५० टक्के महिला शरीरात ‘लोह’ (आयर्न) कमी असल्याने अॅनिमिक
  • टीबी, कॅन्सर, मलेरिया यांसारखे आजार, त्याचसोबत पौष्टीक आहाराची कमतरता यामुळे अॅनिमिया होण्याची शक्यता
  • उत्तरप्रदेश, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, पंजाब, हिमाचलप्रदेश या राज्यांमध्ये जास्त अॅनिमियाग्रस्त महिला
  • हिमाचलप्रदेशात अॅनिमियाग्रस्त महिलांची संख्या वाढली
  • तर दिल्ली, गोवा, हरियाणा, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये किशोरवयीन मुलींमध्ये अॅनिमिया वाढल्याचं दिसून आलं
  • अॅनिमिया, म्हणजे शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या कमी होणं. शरीरात ‘लोह’ या खनिजाचं प्रमाण कमी झालं की अॅनिमिया होतो

याबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना सायन रुग्णालयाचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निरंजन चव्हाण म्हणाले, “महिलांना न मिळणारा पौष्टीक आहार, आणि शरीरातील कमी होणारं लोहाचं प्रमाण यामुळे अॅनिमिया होतो. सायन रुग्णालयात येणाऱ्या १०० रुग्णांपैकी २०-२५ महिला अॅनिमियाग्रस्त असतात. आमच्या रुग्णालयात दरवर्षी १२ ते १४ हजार प्रसूती होतात.”

डॉ. चव्हाण पुढे म्हणतात, “एखादी महिला गर्भवती असतना आमच्याकडे आली, की आम्ही त्या महिलेचं समुपदेशन करतो. प्रथिनं, पिष्ठमय पदार्थ, यांच्यासोबत कडधान्यांचं सेवन महिलांनी केलं पाहिजे. ज्या पदार्थांमधून लोह मिळेल, असे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीप्रमाणे, महिलांमध्ये हिमोग्लोबिन ११ पर्यंत असलं पाहिजे. यासाठी टीव्ही, जाहिरात आणि इतर माध्यमातून महिलांना अॅनिमियाबाबत माहिती दिली पाहिजे.”

देशातील अॅनिमियाग्रस्त रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी केंद्र सरकराच्या आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय आयर्न प्लस कार्यक्रम सुरू केलाय.

  • बाळांसाठी (६ ते ५९ महिने)- आठवड्यातून दोन वेळा IFA सिरप
  • शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी (५ वर्ष ते १० वर्ष) गुलाबी रंगाची IFA टॅबलेट
  • किशोरवयीन मुला-मुलींसाठी (११ ते १९ वर्ष) निळ्या रंगाची IFA टॅबलेट
  • किशोरवयीन मुली आणि महिला (१५ ते ४९ वर्ष) लाल रंगाची IFA टॅबलेट
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter